Bjp Ganesh Hake on NCP Ajit Pawar Group: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केलीये. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केलंय. या विधानामुळे महायुतीमध्ये सार काही आलबेल नसल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने लोकसभेत आपल्याला फटका बसल्याचे मत भाजपच्या गोटातून व्यक्त होतंय. त्यात शिवसेनेकडूनदेखील अजित पवार गटाकडे बोट ठेवण्यात आलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्ष वेगळे लढणार का? की अजित पवार गटाला बाहेरचा रस्ता दाखवणार का? असा प्रश्न यानिमत्ताने उपस्थित होतोय.
दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केलाय.यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. दुर्देवाने आमच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती ना आम्हाला पटली, ना आम्हाला पटली,असे ते म्हणाले. गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्याने त्यांचे विधान गांभीर्याने घेतले जात आहे.
हे गणेश हाके यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट हवं होतं. ते न मिळाल्याने हाके उद्वीग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नाही. विधानसभेला तिकिट न मिळाल्याने अशी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करु नये, असे आवाहन त्यांनी हाकेंना केले. महायुतीमध्ये आम्ही काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जमिनीवर उतरुन काम करतोय. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे यांच्या पोटात दुखतय. वरिष्ठ पातळीवर विधान होतील तेव्हा जशास तसं उत्तर दिली जातील. आपले आमदार आहेत तिथे भाजपला किती मतं मिळाली? याचे हाकेंनी आत्मचिंतन करावं. उगीच अशी विधाने करुन गोंधळ निर्माण करु नये असे सुरज चव्हाण म्हणाले.