औरंगाबाद: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे औरंगाबाद महानगरपालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली होती. यानंतर मतीन यांच्या समर्थकांनी महापालिकेच्या परिसरात प्रचंड धिंगाणा घातला होता. याप्रकरणी शनिवारी पोलिसांकडून मतीन यांना अटक करण्यात आली.
महापालिकेच्या विशेष सभेत शिवसेनच्या राजू वैद्य यांनी भारतरत्न अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र, सय्यद मतीन यांनी त्याला विरोध केला. ते ऐकताच उपमहापौर विजय औताडेंसर इतर संतप्त नगरसेवक मतीन यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मतीन यांना मारहाण करत सभागृबाहेर पिटाळून लावले.
यानंतर सय्यद यांच्या समर्थकांनी महापालिकेबाहेरही धिंगाणा घातला. त्यांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली. यानंतर सय्यद मतीन याचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तसेच मतीन यांना भविष्यात महापालिकेत येण्यास बंदी घालत असल्याचे आदेशही काढण्यात आले आहेत.सय्यद मतीन याने महापालिकेत जो प्रकार केलाय त्याच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचा खुलासा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय. मात्र, एखाद्याला अशाप्रकारे मारहाण करणं योग्य नसल्याचेही जलील यांनी सांगितले.