नवी दिल्ली : Eknath Shinde group in Delhi : शिंदे गटाचे आज दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी 12 खासदार एकत्र पत्रकार परिषद घेऊन एकजूट दाखवणार आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे उद्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील राज्यातील घडामोडींवर सुनावणी होणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का, याचीही उत्सुकता आहे. आज शिंदे गट निवडणूक आयोग, लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहे. आजच सर्व खासदार आणि शिंदे पंतप्रधानांचीही भेट घेण्याचीही शक्यता आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे हे 12 खासदार गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. या भेटीनंतर दिल्लीत या खासदारांसोबत पत्रकार परिषद होण्याची शक्यता देखील आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आता केंद्रात देखील शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेनेचे 12 खासदार उद्या काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या खासदारांना केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार का याकडे ही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दौऱ्यावर आहेत. रात्री दिल्लीत 12 शिवसेना खासदारांसोबत हॉटेलमध्ये चर्चा झाली. आज 12 खासदारांसह शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. तर ओबीसी आरक्षण प्रकरणी ज्येष्ठ वकीलांसोबतही चर्चा झाल्याची माहिती आहे...यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची माहितीही शिंदेंनी दिली आहे.