Big News : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; निवडणूक आयोगाचा आदेश

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे. 

Updated: Mar 18, 2024, 04:10 PM IST
Big News : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; निवडणूक आयोगाचा आदेश title=

BMC Commissioner Iqbal Singh Chahal Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं देशभरातील महत्वाच्या अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. 

अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) देशभरातील अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.  गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्याही बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) काढून टाकण्याची देखील कारवाई केली आहे. 

आयुक्त बंगल्याची चार लाखांची थकबाकी

मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिका आयुक्त यांच्या निवासस्थानाची अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याची सुमारे 4 लाख 56 हजार रुपयांची कर थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात समोर आली होती. यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून याचा खुलासा करण्यात आला. मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याच्या मालमत्ता कर रकमेचे देयक  5 मार्च 2024 रोजी प्रसारित करण्यात आले होते. मालमत्ता कराचे देयक प्रसारित झाल्यापासून त्याचा भरणा करण्याची मुदत तीन महिन्यांची असते. यानुसार सदर देयक भरण्याची अंतिम मुदत ही 5 जून 2024 पर्यंत आहे.  असे असले तरी, सदर संपूर्ण कर देयक अर्थात रुपये 4 लाख 56 हजार इतका भरणा करण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने सुरू केल्याचा खुलासा करण्यात आला.  कार्यालयीन आणि बँकिंग कामकाजाची वेळ लक्षात घेता कार्यालयीन कामकाजाच्या दोन ते तीन दिवसात ही रक्कम प्रत्यक्ष जमा होईल. जनमानसात गैरसमज पसरू नये, म्हणून सदर स्पष्टीकरण देण्यात आले.

कोण आहेत इक्बालसिंह चहल?

इक्बालसिंह चहल हे 1989 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी ते जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.  इक्बालसिंह चहल यांच्याकडे भारतीय प्रशासकीय सेवेचा 30 वर्षांपेक्षा अधिक प्रदीर्घ अनुभव आहे.  नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, औरंगाबादचे जिल्‍हाधिकारी, ठाणे जिल्‍हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्‍पाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, म्‍हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव अशी अनेक पदे इक्बाल चहल यांनी सक्षमतेने भुषवली आहेत.