मुंबई : परतीच्या पावसानं महाराष्ट्रात खरीप हंगामाची काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. राज्याच्या सर्वच भागात परतीच्या पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान विदर्भात झालं आहे. सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यात पाऊस नसतानाही जगवलेलं पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर कोकणात क्यार वादळामुळे भातशेती अक्षरश: झोपली आहे.
परतीच्या पावसानं मनमाडला चांगलंच झोडपून काढलं आहे. पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडलंय. सुमारे तासभर मुसळधार कोसळलेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. यंदा प्रथमच मनमाडमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले होते. अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. पावसामुळे परिसरातील शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. बाजरी, मका, भुईमूग तसंच कांदा पिकाचंही नुकसान झालं आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धिंगाणा घातला आहे. आता हा परतीचा पाऊस शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना नकोनकोसा झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. ऐन काढणीला आलेला हा कापूस दररोजच्या पावसामुळे अक्षरशः झाडावरच ओलाचिंब झाला आहे. तर अनेक कापसाचे बोंड ही सडू लागली आहेत. निवडणुका संपूनही दिवाळी आल्याने पंचनामे होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.