Big Breaking : त्या पीडितेला अखेर न्याय मिळाला; आरोपीला आजन्म कारावास

संपूर्ण देशाला हरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५ हजारांचा दंड सुनावला आहे.

Updated: Feb 10, 2022, 05:00 PM IST
Big Breaking : त्या पीडितेला अखेर न्याय मिळाला; आरोपीला आजन्म कारावास title=

वर्धा : संपूर्ण देशाला हरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५ हजारांचा दंड सुनावला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर आज मृत्यूच्या दिवशीच आरोपीला शिक्षा सुनावून न्यायालयाने पीडितेला न्याय दिला आहे. 

हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात काल या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि सरकारी वकिलाच्या विनंतीवरून शिक्षेचा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. 

न्यायालयात आज निर्णय जाहीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. परिसरातील शासकीय कार्यालये आणि न्यायालयाच्या सभोवतालची सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तसेच, पीडित प्राध्यापिकेचे गाव असलेल्या दारोडा या गावातही तगडा बंदोबस्त होता.

आज न्यायालयात आरोपीचा युक्तिवाद झाला. यावेळी आरोपीतर्फे त्याचे लग्न झाले आहे, त्याला दया दाखवावी असे सांगण्यात आले. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. 

काय आहे प्रकरण ?

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण 2 फेब्रुवारी 2020 ला घडले होते. हिंगणघाट येथील नांदोरी चौकात पेट्रोल टाकून पीडितेला जाळण्यात आले होते. 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला होता.

पीडितेच्या मत्यूनंतर वर्ध्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. यावेळी आरोपींवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला अटक करण्यात आले. तर, या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी नियुक्ती करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार होती. पण, न्यायालयीन कामकाज पूर्ण न झाल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्याची काल सुनावणी पूर्ण होऊन आरोपीवरील आरोप सिद्ध झाले. आजच्याच दिवशी पीडित प्राध्यापिकेचा मृत्यू झाला होता त्याच दिवशी आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.