भुलाबाईची गाणी : सर्जनतेचा आणि मातृत्वाचा गौरव

आपल्या सगळ्या परंपरा आनंद मिरवत येतात. या परंपरा बऱ्याचवेळा शेतीशी निगडीत असतात... आणि सुखदुःखाची देवाणघेवाण करणाऱ्याही असतात...

Updated: Oct 26, 2018, 09:15 AM IST
भुलाबाईची गाणी : सर्जनतेचा आणि मातृत्वाचा गौरव  title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : आपल्या सगळ्या परंपरा आनंद मिरवत येतात. या परंपरा बऱ्याचवेळा शेतीशी निगडीत असतात... आणि सुखदुःखाची देवाणघेवाण करणाऱ्याही असतात...

खोडकर गाणी

भूलाबाई... या चार अक्षरी शब्दांभोवतीच विदर्भातल्या महिलांच्या अनेक पिढ्यांचं भावविश्व साकारलं गेलंय. 'पहिली गं पूजा बाई... देवा-देवा साजे' हे गाणं  कोणत्याही सासुरवाशिणीला आनंदाच्या हिंदोळ्यांवर झुलवणारं... मागचा आठवडा राज्याच्या ग्रामीण भागांत याच गाण्यांच्या स्वरात न्हाऊन निघालाय. 'भूलाबाई'च्या गाण्यात खोडकर आनंद असतो. सासुरवाशिणीनं मैत्रीणीची काढलेली खोडीही असते... अन् तिच्या मनात दाटलेलं अव्यक्त दु:खही असतं...

सर्जनतेचा उत्सव

भुलाबाई म्हणजे नेमकं काय? तर भूलाबाई म्हणजे पार्वती... जगन्माता... भूमीसारखी सर्जनशील... हा खेळोत्सव म्हणजे भूमीचा पार्वतीचा सर्जनोत्सव अन शिवशक्तीची पूजा... एक प्रकारचा सुफलन विधी... भूलोबा हे शंकराचे प्रतिक... या पूजेत खेळोत्सवात शंकराची फक्त हजेरी असते.

सासुरवाशिणीची गाणी 

भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या एक महिन्याच्या कालावधीत भूलाबाईचा उत्सव चालतोय. खेळत्या वयाच्या मुली, सासूरवाशिणी भूलाबाईंची घरी प्रतिष्ठापना करतात. तर काही ठिकाणी सात किंवा एक दिवसांचाही हा उत्सव केला जातो.

विदर्भाचा गोडवा

विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत आणि खानदेशातील जळगाव जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र, भुलाबाईच्या उत्सवाची श्रीमंती ही विदर्भात फार जास्त पाहायला मिळते. 

विदर्भातल्या ग्रामीण भागात कोजागरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये दणक्यात साजरी केली जाते. माळी पौर्णिमेचा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून लहान मुली आणि महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात.

'भोडनी' आणि 'खिरापत'

संध्याकाळी सामूहिकपणे मैत्रिणींसोबत गाणी म्हटली जातात. या गाण्यांना टाळ्या अथवा टिपऱ्यांची साथ असते. विदर्भात भाद्रपद पौर्णिमेला भोडनी असं म्हणतात... घरोघरी भुलाबाईची सजावट केली जाते... घरोघरी जाऊन मुली भुलाबाईची गाणी म्हणतात. त्यानंतर खिरापत किंवा खाऊ ओळखल्यानतंर सर्वांना खिरापत म्हणजेच प्रसाद दिला जातोय.

मातृत्वाचा गौरव

मातृत्वाबाबतची वर्णने गीतातून गाणाऱ्या भुलाबाई उत्सवाचा उद्देश मातृपूजा आणि मातृत्वाचा गौरव... कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विदर्भातील शेतकरी ज्वारीच्या धांड्यांनी किंवा उसाच्या खोंडांनी खोपडी सजवून त्यात भुलाबाईला बसवतात... तसंच या काळात खरिपाची पिके कापणीला येतात... म्हणूनच नवीन आलेल्या धान्याच्या पूजन म्हणूनही हा भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो.  

आपल्या अनेक प्राचीन परंपरा अन रूढींनी देशाची लोकधारा सम्रूद्ध केलीय. खिरापतीच्या प्रसादासोबत भूलाबाईचा हा समृद्ध ठेवा जतन करुया.