Chhagan Bhujbal : मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात ओबीसी नेते प्रचंड आक्रमक झालेत. सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात दिवाळीनंतर रस्त्यावर लढाई सुरू करण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय. त्याचबरोबर याविरोधात कोर्टातही जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
सरसकट मराठा आरक्षणाला विरोध करण्यावरुन छगन भुजबळांविरोधात सर्वपक्षीय मराठा नेते एकवटलेले असताना..भुजबळांना ओबीसी नेत्यांचं समर्थन वाढलंय. राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आणि भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन केलं. या बैठकीत आमदार प्रकाश शेंडगे, प्राध्यापक टी.पी.मुंडे, जे.डी.तांडेल, लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते. भुजबळांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ओबीसी नेत्यांनी थेट देशभरातल्या ओबीसी नेत्यांना साद घातलीय.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देतील ते सत्तेबाहेर जातील असा खणखणीत इशारा यापूर्वीच छगन भुजबळांनी सरकारला दिलाय.ओबीसी आरक्षणाबद्दल भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी समर्थन केलंय. ओबीसी शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेत मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी केली.
महायुतीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भुजबळ एकटे पडताना दिसतायत. त्याचवेळी राज्यातले ओबीसी नेते भुजबळांच्या मदतीला धावून गेलेत. दिवाळीनंतर देशातल्या ओबीसी नेत्यांना राज्यात बोलावून आंदोलन उभारणार असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे नजीकच्या काळात ओबीसी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या भुजबळांवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता तिखट टीका केलीय. आपण केवळ माळी म्हणून नव्हे तर सर्व ओबीसी जातींचे नेते म्हणून भूमिका मांडत असल्याचं विधान भुजबळांनी केलं होतं त्यावर बोलताना आंबेडकरांनी ही टीका केलीय.
सरसकट कुणबी दाखले देणं कुठल्याही ओबीसींना मान्य नाही, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, अशी मागणी या नेत्यांनी केलीय.
मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजही आक्रमक झालाय. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यात घनसावंगी तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी सहभागी झाले होते. यावेळी आरक्षणावरून ओबीसी नेत्यांना जरांगे यांनी टार्गेट करू नये तर मराठा नेत्यांना टार्गेट करावं असा इशाराही आंदोलकांनीं दिलाय. तसंच ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाला दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.