भोंगा vs हनुमान चालीसा : मनसे आक्रमक; राज्यात या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा आणि विना आवाज अजान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाशिम, नवी मुंबईतील नेरुळमध्ये अजान सुरु असताना हनुमान चालिसेचं पठण करण्यात आले. 

Updated: May 4, 2022, 08:18 AM IST
भोंगा vs हनुमान चालीसा : मनसे आक्रमक; राज्यात या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा आणि विना आवाज अजान title=

मुंबई : Bhonga vs Hanuman Chalisa: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाशिम, नवी मुंबईतील नेरुळमध्ये अजान सुरु असताना हनुमान चालिसेचं पठण करण्यात आले. तर जय श्रीरामच्याही घोषणा देण्यात आली. मुंबईच्या चांदिवली, चारकोपमध्ये मशिदीसमोर चलिसा तर पंढरपूर, मनमाड, कल्याण-डोंबिवली, मुंबईच्या काही भागात भोंग्याविना अजान झाली. मशिद, मंदिरांच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्याविना झाली. मुंबईच्या अनेक भागात मशिदीवरील पहाटेची अजान भोंग्याविना झाली. कल्याण डोंबिवलीतही आज पहाटे अजान भोंग्याविनाच झाली. मनमाडलाही भोंग्याविनाच अजान झाली. मनमाड पोलिसांनी काल शहरातील सर्व धर्मगुरूंची बैठक घेऊन त्यांना पहाटेची अजाण भोंग्यांवर देऊ नये असं आवाहन केलं होतं.

मुस्लिम बांधवांनी त्याला प्रतिसाद देत मनमाडमध्ये पहाटेची आजन भोंग्यांविना केली. तर पंढरपूरमध्येही आज पहाटे भोंग्याशिवाय अजान झाली. पंढरपूर शहरात 7 मशिदी आहेत. यातल्या कोणत्याही मशिदीवर भोंगा वाजला नाही. पंढरपूरमध्ये सर्वधर्म समभाव जपण्याची परंपरा आहे. पंढरपूरमधल्या मुस्लिम बांधवांनी भोंगे न वाजवता मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. 

मुंबई-ठाण्याते मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड 

मुंबई-ठाण्याते मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. ठाण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कल्याणमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नवी मुंबई शहर उपाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात तर नाशिकमध्ये महिला कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.

मुंबईत आज माहीम दर्गामध्ये (mahim dargah)अजान कमी आवाजात झाली. मनसैनिकांनी ज्याचं स्वागतच केलं आहे. आज सकाळपासून च माहीम दर्ग्याबाहेर पोलीस बंदोबस्त दिसून आला. आज मुस्लिमांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. मुस्लीम बांधवांनी ही समजून घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुस्लिमांनी दिली आहे.  

नाशकात मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

नाशिकमध्ये सातपूर मशिदीसमोर भोंगा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी पोलिसांनी भोंगा, बॅटरी अशा वस्तूही जप्त केल्या. सातपूरच्या मशिदीसमोर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान सातपूरच्या मशिदीमध्ये पहाटेची अजाण भोंग्याविना झाली. 

कल्याण डोंबिवलीत मशिदीबाहेर कडेकोट सुरक्षा 

कल्याण डोंबिवलीत मशिदीबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलीय. काल रात्री मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काल रात्रीपासूनच मशीद मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती. पोलिसांनी मशिदीमधील भोंग्यांबाबत मुस्लिम समाज बांधवांशी चर्चा केली होती. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी भोंग्याविनाच अजान झाली. मशिदीवर पहाटे भोंगे वाजले नाहीत. पोलीस यंत्रणेने शहरात कायदा सुव्यवस्था राखावी तसंच शांतता पाळावी असं आवाहन केलंय. 

पुणे शहरात मनसेच्यावतीने खालकर मारुती चौकामध्ये आरतीचे आयोजन करण्यात आले होते. खालकर मारुती मंदिरा बाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.आज पहाटे पुणे शहरामध्ये सर्वत्र भोंग्या विना आजण करण्यात आली. कुठेही अनुचित प्रकार घडलेला दिसत नाही .पोलिस बंदोबस्त मशीद बाहेरही तैनात करण्यात आलाय.  

सातारा येथे मंदिरात महाआरतीचे आयोजन 

मनसेकडून साताऱ्यातील राजवाडा इथल्या हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .या आरतीला सातारा पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी सर्व धर्मीय समाजाच्या व्यक्तींना एकत्र घेऊन ही महाआरती घेण्यात आली यावेळी मुस्लिम बांधव ,पोलीस अधिकारी देखील या महाआरतीत सहभाग होते राज्यभरात जरी मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण तापले असले तरी साताऱ्यात मात्र जातीय सलोख्याचे दर्शन पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पहाटे सर्वत्र आजान 

कोल्हापूर जिल्ह्यात पहाटे सर्वत्र आजान व्यवस्थित पार पाडली. कोल्हापूर शहरात 30 मशिदीमध्ये तर जिल्ह्यात 400 हून अधिक मशिदीत पहाटे 6 वाजता आजान झाली. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान रात्री मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. कोल्हापुरात अजान होत असताना कुठेही हनुमान चालिसा वाजली नाही. 

औरंगाबादमध्ये आज अजान

औरंगाबादमध्ये आज अजान झाली मात्र त्याचा आवाज अत्यंक कमी होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून औरंगाबादच्या ग्रामीण भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 24 तास पोलीसांची गस्त असणार आहे.. समाजकंटक, गुंडांच्या हालचालींवरही पोलिसांची करडी नजर आहे.. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय. 

वाशिममध्येही मनसे कार्यकर्ते आक्रमक

वाशिममध्येही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, अजान सुरू होताच मनसेनं हनुमान चालिसा लावली...मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावली...राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केल्यानंतर याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ठिकठिकाणी मनसेनं हनुमान चालिसा पठण केले.