मोनिश गायकवाड, झी मीडिया, भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी उद्योजक असलेल्या जनार्दन भोईर यांनी आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो. पण जनार्दन भोईर यांच्यासाठी हे तंतोतंत जुळलेलं पाहायला मिळालं. या शेतकरी उद्योजकाने हेलिकॉप्टर खरेदी केल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला. या भागात आर्थिक सुबत्ता आल्याने ग्रामीण भागात मर्सिडीझ ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु,रेंजरोव्हर, कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात .एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडील्याक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर येथील अरुण आर पाटील या आगरी समाजातील उद्योजकांकडे आहे.
आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वाना अचंबित केले आहे.
घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले. तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसायानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले.
त्यांना दुग्ध व्यवसायासाठी पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान या भागात नेहमी जावे लागते. तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी घरी सत्व सुबत्ता असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले .
त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे.
आज गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जनार्दन भोईर यांनी स्वतः न बसता नुकताच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींना फेरफटका मारून आणला.