बुलढाणा: राज्यातील पाऊस आणि शेतीबाबत अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी नुकतीच जाहीर झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो. यंदा लॉकडाऊनमुळे ही घटमांडणी अक्षय तृतीयेला होऊ शकली नाही.
'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
अखेर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आले. त्यानुसार यंदा राज्यात भरपूर पाऊस पडेल. तर शेतीचे पीकही साधारण राहील. देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आली. देशाची आर्थिक स्थिती कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी असं असेल पर्जन्यमान; शेतकरी वर्गाने जरुर वाचा
त्यानुसार जून महिन्यात पाऊस साधारण पडेल. जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल. तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण संमिश्र असेल. सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक आणि जास्त पाऊस होईल. काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये यंदा पर्जन्यमान साधारण असेल, असे सांगण्यात आले होते.
गेल्या ३५० वर्षांपासून भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तवण्यात येते. यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह चार लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविले.