Bhandra News : रंगपंचमीच्या उत्सवाला गालबोट; एकुलत्या एक मुलाला पाहून कुटुंबियांनी फोडला हंबरडा

Bhandra News : एकीकडे राज्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा सण साजरा होत असताना भंडारा जिल्ह्यात एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने परिसात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 

Updated: Mar 7, 2023, 05:16 PM IST
Bhandra News : रंगपंचमीच्या उत्सवाला गालबोट; एकुलत्या एक मुलाला पाहून कुटुंबियांनी फोडला हंबरडा title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : राज्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा (Rangpanchami) सण साजरा करण्यात येत आहे. मात्र या भंडारा (bhandra news) जिल्ह्यात उत्सवाला गालबोट लागलं आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने तलावावर पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखोरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने हा विद्यार्थी गावाशेजारील तलावावर पोहायला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थ्याचा बुडून मृ्त्यू झाला आहे.

16 वर्षीय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने लाखोरी गावात हळहळ व्यक्त होत आहे. चैतन्य राजेश मुटकुरे (16) मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य हा उज्वल विद्यालय येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रंगपंचमी खेळून गावातील चार ते पाच मित्रांसोबत तो तलावावर अंघोळीसाठी गेला होता. चैतन्यने तलावाच्या काठावर कपडे काढून अंघोळीसाठी पाण्यात उडी घेतली. यावेळी त्याचे चार मित्रही पाण्यात उतरले. मात्र पोहता पोहता चैतन्य खोल पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.

चैतन्यला बुडताना पाहून मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही. इतर मुलांनी बाहेर येऊन आजूबाजूच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती गावात कळताच लोकांनी एकच गर्दी केली. स्थानिकांनी पोलिसांना आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला याची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ मृतदेहाचा शोध सुरु केला. त्यानंतर काही तासांतच चैतन्यचा मृतदेह हाती लागला. चैतन्य हा सर्वांचा लाडका होता. त्यामुळे त्याचा मृतदेह पाहताच घरच्यांनी हंबरडा फोडला. त्यानंतर चैतन्यचा मृतदेह शवविच्छेदनाकरता लाखनी येथे पाठवण्यात आला आहे. 

गोंदियात तरुणाचा बुडून मृत्यू

दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कारुटोला येथे 19 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. रणजित देवचंद रहांगडाले असे या मृत तरुणाचे नाव असून 24 तासांनंतर त्याचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला आहे. सोमवारी दुपारी गुरे चारण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना कारुटोला येतील पांढरा तलावाच्या किनाऱ्याजवळ कपडे आणि मोबईल व सायकल सापडली होती. मात्र तलावात कोणीच पोहताना दिसत नसल्याने त्यांनी याबाबत गावात माहिती दिली. त्यानंतर तपास केल्यानंतर मंगळवारी दुपारी रणजितचा मृतदेह हाती लागला आहे.