Bhandara LokSabha : यंदाही भंडाऱ्यात नवा खासदार? पुन्हा काँग्रेसचं 'टायमिंट' चुकणार? पाहा राजकीय गणित

Bhandara - Gondiya Election : भंडारा गोंदियात कुणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार इथून निवडून आलाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) भंडारा गोंदियाची जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार? पाहूयात हा रिपोर्ट...

सौरभ तळेकर | Updated: Mar 16, 2024, 08:56 PM IST
Bhandara LokSabha : यंदाही भंडाऱ्यात नवा खासदार? पुन्हा काँग्रेसचं 'टायमिंट' चुकणार? पाहा राजकीय गणित title=
Bhandara Gondiya constituency in maharashtra

Bhandara - Gondiya LokSabha Election : भंडारा गोंदिया... म्हणजे तलावांचा जिल्हा... विदर्भातली तांदूळ नगरी... मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला खेटून असलेला हा परिसर... झाडीबोली ही इथली ओळख.. कधीकाळी पितळ उद्योगात आघाडीवर असलेला भागातून पितळेची भांडी निर्यात व्हायची.भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, बावनथडी आणि चुलबंद तर गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह, कालीसराड अशा सिंचन प्रकल्पासाठी आतापर्यंत करोडो रुपये खर्च झालेत. मात्र शेतकऱ्यांऐवजी राजकीय पुढाऱ्यांनाच त्याचा लाभ झाल्याचं दुर्दैवी चित्र दिसतंय.

भंडाराच्या समस्या काय?

1984 मध्ये गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी झाली तेव्हा अंदाजित खर्च 372 कोटी रुपये होता. आता या प्रकल्पाची किंमत 30 हजार कोटींवर गेलीय. शेतकऱ्यांचा पाण्याचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न तसाच भिजत पडलाय. वाळू तस्करीचा प्रश्न गंभीर बनलाय. राजकीय पुढारीच वाळू चोरीत गुंतले असल्यानं प्रशासनाचा अंकुश नाही. मँगनीजच्या खाणी, अदानी प्रकल्प असतानाही स्थानिकांना रोजगार मिळत नाही. परराज्यातून आलेल्यांना नोकऱ्या मिळतात, अशी ओरड होतेय. तांदूळ नगरी असली तरी तांदूळनिर्मितीचा मोठा उद्योग इथं उभा राहिलेला नाही.

भंडारा गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, परिणय फुके असे बडे राजकीय नेते आहेत. मात्र विकासाच्या आघाडीवर मतदारसंघात फारशी प्रगती झालेली दिसत नाही.

भंडारा गोंदियाचं राजकीय गणित

2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी अपक्ष उमेदवार नानाभाऊ पटोलेंचा अडीच लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता. मोदी लाटेत 2014 मध्ये नाना पटोले भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी प्रफुल्ल पटेलांना दीड लाख मतांनी हरवलं. मात्र पंतप्रधान मोदींशी मतभेद झाल्यानंतर पटोलेंनी खासदारकीचा राजीनामा दिला. 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकरराव कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटलेंचा पराभव केला. 2019 मध्ये भाजपच्या सुनील मेंढेंनी पुन्हा एकदा ही जागा जिंकली. त्यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धेंना सुमारे 2 लाख मतांनी पराभूत केलं. विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर तिरोरा आणि गोंदियात भाजपचे 2 आमदार आहेत. अर्जुनी मोरगाव आणि तुमसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत साकोलीतून काँग्रेसचे नाना पटोले आमदार आहेत. तर भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष आमदार निवडून आलेत.

भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यासह माजी मंत्री परिणय फुके, राजेंद्र पटले, विजय शिवणकर आणि माजी आमदार रमेश कुथे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह प्रशांत पडोळे, चंद्रकांत निंबारते, मोहन पांचभाई यांच्या नावाची चर्चा आहे. भंडारा गोंदियात कुणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी दिसत नाही. कधी भाजपचा तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार इथून निवडून आलाय. आता काँग्रेसनंही इथं जोर लावलाय.

दरम्यान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही भंडारा गोंदियातून पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रत्येक निवडणुकीत नवा खासदार देण्याची परंपरा इथल्या मतदारांनी आतापर्यंत न चुकता पाळलीय. यंदाही तिचं पालन होणार की त्यात बदल होणार? असा सवाल विचारला जातोय.