विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंती आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा काल वाढदिवस होता. या निमित्ताने 12 डिसेंबर रोजी जन्म झालेल्या नवजात बालकांना बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्याकडून सोन्याची अंगठी आणि मातांना साडी चोळीचे वाटप करण्यात आलं. गेवराई शासकीय रुग्णालयात जन्म घेतलेल्या 12 नवजात बालकांचंही यावेळी औक्षण करण्यात आलं.
नेते मंडळींचा वाढदिवस म्हटलं की डमडोल करून बॅनरबाजी करून अनेक जण धन्यता मानतात. पैशांचा चुराडा केला जातो. पण याला बगल देत गेल्या काही वर्षांपासून बी एम प्रतिष्ठान 12 डिसेंबरला सामाजिक उपक्रम राबवत आहे. यावर्षी देखील गेवराई शहरात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आणि शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई इथल्या रुग्णालयामध्ये जन्म घेतलेल्या 12 मुला मुलींना सोन्याची अंगठी भेट देण्यात आली आणि या लहानग्यांच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांनी आपल्या कर्तुत्वाने छाप उमटवली आहे. त्यामुळे 12 डिसेंबर हा दिवस कायमस्वरूपी आठवणीत राहावा यासाठी 12 तारखेला जन्म घेतलेल्या सहा मुले आणि सहा मुलींना गेवराई इथल्या उप जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या मातांना आहेर देण्यात आला.
दोन सोनेरी व्यक्ती आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस होता. सोनेरी व्यक्तींच्या वाढदिवसाच्यादिवशी सोनेरी मुलं जन्माला आलेत त्यांना सोन्याच्या अंगठ्या भेट देऊन त्यांच्या जन्माचं स्वागत आम्ही केलं या सर्वांचा मामा होण्याचा आज मला मान मिळालाय अशी भावना यावेळी बाळासाहेब मस्के यांनी व्यक्त केली
रुग्णालयामध्ये अचानक अशा स्वागताचा अनोखा कार्यक्रम पाहून अनेकांना नवल वाटलं. तर आपल्या लहानग्याला पहिल्याच दिवशी सोन्याच्या स्वरूपात अमूल्य भेट मिळाल्यामुळे नवजात बालकांच्या मातांनी देखील आनंद व्यक्त केला.