लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : परळी येथील महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी सुदाम मुंडे, त्यांची पत्नी सरस्वती मुंडे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या महादेव पटेकर याला आज बीड जिल्हा न्यायालयानं दोषी करार दिलंय. दोषींना न्यायालयानं दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलीय. कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५, ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार गुन्हा सिद्ध होऊन हे तिघेही दोषी ठरले आहेत. गेल्या साडे सहा वर्षांपासून मुंडे कारागृहात असल्यानं तो काळ वजा करून उर्वरित शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे.
मे २०१२ साली विजयमला पटेकर या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंडे हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते. त्यातील तिघांना बीडचे दुसरे जिल्हा न्यायाधीश गांधी यांच्या न्यायालयानं दोषी करार दिलंय तर ११ जणांना निर्दोष सोडण्यात आलंय. उर्वरित आरोपींपैंकी चार जणांचा आधीच मृत्यू झालाय. या आरोपींपैंकी एक असलेल्या जळगावच्या डॉक्टर राहुल कोल्हे याचा अपघाती मृत्यू झाला होता.
बीड जिल्ह्यातील परळी येथील डॉ सुदाम मुंडे आणि त्यांच्या पत्नी सरस्वती मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये अवैध पद्धतीने गर्भपात आणि लिंगनिदान केले जात असल्याचे समोर आले होतेय. राज्यात नव्हे तर देशात हे प्रकरण गाजले होते. मुंडे दाम्पत्य हे अवैध पद्धतीने गर्भपात करून पुरावे नष्ट करण्यासाठी गर्भातून काढलेलं भ्रूण कुत्र्याला खायला घालत असल्याचं उघड झालं होतं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमचा रद्द केला होता.
या प्रकरणात डॉ मुंडे दाम्पत्यविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून हे दोघे पती पत्नी कारागृहात होते. सुरुवातीच्या काळात हा खटला अंबाजोगाईच्या न्यायालयात चालला नंतर २०१६ मध्ये हा खटला बीडच्या जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आला. या खटल्याचा आज निकाल लागला.
याआधी, २०१० सालीही 'लेक लाडकी अभियाना'च्या प्रमुख ऍड वर्षा देशपांडे यांनी स्टिंग ऑपरेशन करून मुंडे दाम्पत्याच्या रुग्णालयात अवैध गर्भलिंग चाचणी आणि अवैध गर्भपात होत असल्याचं जगासमोर आणलं होतं. यानंतर महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंडे हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणीचे रेकॉर्ड अध्यायावत ठेवले नसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी वेगवेगळ्या कलमांखाली आठ गुन्हे मुंडे दाम्पत्यावर दाखल करण्यात आले होते. यापैंकीच म्हणजे २०१० साली दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल. जी. पाचे यांनी दोन्ही आरोपींना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती.
आज २०१२ साली दाखल झालेल्या विजयमला पटेकर मृत्यू प्रकरणातही मुंडे दाम्पत्य आणि महादेव पटेकर हे तिघे दोषी ठरलेत.