माढा मतदारसंघातून पुन्हा एकदा शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 8, 2019, 03:01 PM IST
माढा मतदारसंघातून पुन्हा एकदा शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात? title=

नवी दिल्ली / पुणे - यापुढे मी कोणतीही लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. माढा मतदारसंघातून गेल्यावेळी निवडून आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांना यंदा थांबण्याची सूचना करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे मोहिते-पाटील समर्थक नाराज आहेत. माढा मतदारसंघातून खुद्द शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानेच विजयसिंह मोहिते-पाटील यांना तूर्त थांबण्याची सूचना करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये शुक्रवारी शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातूनच निवडून आले होते. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उभे न राहण्याचा निर्णय घेतला होता. यापुढे लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर ते राज्यसभेत गेले होते. यंदाची निवडणूक भाजपविरोधातील सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. भाजपविरोधातील महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सहभागी आहे. त्याचबरोबर पुढील पंतप्रधान कोण होणार, यावर महाआघाडीत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सुरू केलेली तयारी महत्त्वाची मानली जात आहे. 

दरम्यान, २०१४ मध्ये देशात मोदी लाट असतानाही माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयसिंह मोहिते-पाटील निवडून आले होते. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत या मतदारसंघातून मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत होती. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली होती. पण आता त्यांना तूर्त थांबण्याची सूचना करण्यात आल्यनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. विजयसिंह मोहिते-पाटील आता काय भूमिका घेतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.