ठाणे : कल्याण, डोंबिवली, ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं एमआयडीसचं बारवी धरण भरून वाहू लागलं आहे. त्यामुळे काल रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मागील वर्षी पेक्षा दोन दिवस आधीच बारवी धरण भरलं आहे. बारवी धरण भरल्यामुळे कल्याण, डोंबिवली, आणि उल्हासनगरचा पाणीप्रश्न मिटला आहे.
बदलापूर आणि मुरबाड या दोन शहरांच्यामध्ये हे बारवी धरण आहे. या धरणातून ठाणे, कल्याण- डोंबिवली, मीरा भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, उल्हासनगर या शहरांसह अनेक ग्रामपंचायती आणि लघु उद्योग तसेच कारखान्यांना पाणीपुरवठा होतो. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा बारवी धरण मागच्या वर्षीच्या तुलनेत 2 दिवस आधीच ओव्हरफ्लो झालं आहे. बारवी धरणाची पातळी ६५.५ मीटर आहे. ही पातळी ओलांडल्यानंतर धरण भरून वाहू लागते.