Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगावमध्ये ग्रामस्थांच्या विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरुच आहे. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक झाली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. सोमवार आणि मंगळवारी बारसूमध्ये ग्रामस्थांनी तीव्र विरोध करताना रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकल्प आम्हाला नकोच, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाड्याही रोखल्या होत्या. महिला रस्त्यावर झोपत प्रकल्पाला आणि सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेत रत्नागिरीच्या दिशेने गाड्या निघून गेल्या. तसेच याआधी विरोध करणाऱ्यांपैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करुन किंवा शेतकऱ्यांना भिती घालून आपण प्रकल्प करु शकतो, अशी जर सरकारची मानसिकता असेल तर याद राखा! शेतकरी कुठलाही असेल? तर आम्ही सर्व एक आहोत. याचं भान ठेवून पावलं उचला, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरीतल्या बारसूमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी ग्रामस्थांचे 10 प्रतिनिधी हजर होते. एक तासाहून जास्त वेळ ही बैठक चालली. यात ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ग्रामस्थांची समाधान झालेले नाही. आता उद्या गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघणार का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. स्थानिक महिलांनी हा प्रकल्प आम्हाला नकोच, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आधी मुंबईतील मेट्रो कार शेडच्या आरे प्रकल्पाला विरोध केला, आता रिफायनरीला करत आहे. या विरोधाची सुपारी कुणाकडून घेतली, असा सवाल फडणवीसांनी ठाकरे यांना केला आहे. राजकारणासाठीचा त्यांचा विरोध खपवून घेणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. त्याचवेळी कोकणात प्रकल्प आले पाहिजेत, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. मात्र विनाशकारी प्रकल्प नको, कल्याणकारी प्रकल्प हवेत, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. लोकांची मतमतांतरं सरकारनं समजून घ्यावीत असं आवाहन मनसेने केले आहे.