Baramati Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने आता लोकसभा निवडणूकही अटीतटीची होणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजित पवारांकडून मोठी खेळी खेळण्यात येणार आहे. बारामतीत लोकसभेमध्ये नणंद-भावजयीत लढत होण्याची चिन्हे आहेत.
बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवारही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार असल्याची शक्यता आहे. सुळे यांच्या विकास रथाला सुनेत्रा पवार यांनी विकास रथातून उत्तर देणार आहेत, अशा चर्चा रंगत आहेत. सुप्रिया सुळे यांचा विकास रथ आधीपासून मतदारसंघात फिरतोय. त्याचबरोबर आता गेल्या काहि दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचाही विकास रथ बारामती मतदारसंघात फिरताना दिसत आहे. तसंच, पवार यांनी काल दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली होती.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, आता सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा व प्रचार करणारा विकासाचा रथ मतदारसंघात फिरताना दिसत आहे. गुरुवारी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर हा बारामती आणि इतर गावांमध्ये रथ फिरताना दिसत आहे. त्यामुळं नणंद-भावजयमध्ये हा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ बारामती शहरामध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून काटेवाडी ग्रामपंचायतचा विकास असेल बारामती टेक्स्टाईल, विद्या प्रतिष्ठान अशा विविध सामाजिक व शैक्षणिक, पर्यावरण, महिला सबलीकरण अशा विविध संघटनांवरती मागील तीस वर्षाहून अधिक काळ सुनेत्रा पवार ह्या काम करत आहेत. त्याचा प्रचार करण्यात येत आहे.
सुप्रिया सुळे या सलग तीन टर्म बारामतीच्या खासदार आहेत. या काळात त्यांनी विविध कामे केली आहेत. या जोरावर त्या संपूर्ण मतदारसंघात दौरा करत असतात. गावोगावी जाऊन त्यांचा संपर्क वाढवत आहेत. इंदापूर, खडकपूर, बारामती, दौंड, पुरंदर या भागातही त्या फिरत असतात. तर, एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती सेक्शन पार्क असेल किंवा इतर माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळं लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत करणारच असं आव्हान दिल्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे सध्या वाढू लागले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापुर शिरूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी होत खेळ पैठणीचा खेळला. यावेळी सुनेत्रा वहीणी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांचा नाव घेत उखाणादेखील घेतला. तर दुसरीकडे पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची हि शक्यता सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळं मुलाच्या प्रचारासाठीच सुनेत्रा वहिनी शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असल्याचं ही बोललं जात आहे.