'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...'

Raj Thackeray On Badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र, 10 मिनिटात दौरा आटोपला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Aug 28, 2024, 07:37 PM IST
'पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप...', बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्ट म्हणाले 'धडा शिकवायचाय तर...' title=
Raj Thackeray On Badlapur case

Raj Thackeray In Badlapur : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. अशातच राज ठाकरे बुधवारी बदलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांनी रिकाम्या खुर्च्या पाहिल्या अन् 10 मिनिटांत बदलापूर दौरा आटोपला. मात्र, राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या. 

काय म्हणाले राज ठाकरे?

बदलापूरची दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि महिला सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ही घटनाउघडकीस आणली, त्या दुर्दैवी पालकांच्या कुटुंबियांना आधार दिला. या घटनेच्या आसपास मी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान विदर्भात होतो. यामुळे महाराष्ट्र सैनिकांशी आणि इतरांशी फोनवर संवाद साधला. आज मात्र बदलापूरला जाऊन, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी, तिथल्या स्थानिकांची जाऊन भेट घेतली, असं राज ठाकरे म्हणाले.

बदलापूरची घटना, त्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने (पोलीस अधिकारी महिला असून देखील त्यांना त्या मुलींची व्यथा समजू नये?) दाखवलेला हलगर्जीपणा, बेफिकिरी इतकी टोकाची होती की लोकांचा राग अनावर होणं, त्यातून निदर्शनं होणं हे स्वाभाविकच होतं. अशा उद्रेकानंतर परिस्थिती ही नरमाईने हाताळायची असते. पण इथे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेलेत. लोकांच्या मागे ससेमिरा लावला गेला आहे. हे चूक आहे. असं होता कामा नये, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे. 

मी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून, आंदोलकांना त्रास न देण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला. मी नेहमी म्हणतो तसं की महाराष्ट्रातील पोलिसांवर इतका ताण असताना पण ते ज्या पद्धतीने राज्य हाताळतात ते वाखणण्याजोगं आहे. पण शेवटी पोलिसांवर पण कुठून कुठून येणारा ताण, राजकीय हस्तक्षेप याचा त्यांना कायम त्रास असतो. तस इथेही राजकीय हस्तक्षेप आहे असं मला जाणवतंय, याबद्दल मी सरकारशी बोलणार असल्याचं देखील राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

सामान्यांना वेठीस धरण्याच्या ऐवजी, राज्यातील स्त्रिया सुरक्षित राहतील हे पाहिलं तर अशा प्रकारची निदर्शनंच होणार नाहीत. त्यामुळे सरकारने आपलं प्रथम कर्तव्य या घटना होऊ न देणे, गुन्हेगारांना शासन करणे हे विसरू नये आणि मागे मी म्हणलं तसं महाराष्ट्र सैनिकांनी या घटनेत जशी सतर्कता दाखवली तशी यापुढे पण कायम दाखवावी. गरज पडली तर अशा घाणेरड्या प्रवृत्तींना हात सोडून कसा धडा शिकवायचा हे तुम्हाला माहीतच आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.