शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची दूरवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याची दूरवस्था झाली आहे. 

Updated: Jul 19, 2017, 06:08 PM IST
शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची दूरवस्था  title=

विशाल वैद्य, प्रतिनिधी, झी मीडिया कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याची दूरवस्था झाली आहे. महिन्याभरापूर्वी ढासळलेल्या बुरुजाची अजूनही डागडुजी करण्यात आलेली नाही. झाड कोसळल्यानं किल्ल्यावरील मंदिराच्या कठड्याचा काही भाग निखळला आहे.

देशात स्वराज्याचं पहिलं आरमार म्हणून कल्याणच्या खाडीकिनारी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याची मात्र आता ही अवस्था झाली आहे. सध्या जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणेचं दुर्लक्ष झालंय.

कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या किल्ल्याची पाहणी केलीय. हा किल्ला आमच्या ताब्यात द्यावा आम्ही सुस्थितीत करु असा घरचा आहेर त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याच्या दूरवस्थेप्रकरणी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. रविवारपर्यंत डागडुजी झाली नाही तर उपोषण आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आलाय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय पक्ष आपापलं राजकारण करतात. अरबी समुद्रात शिवरायाचं स्मारक उभारण्याची सरकारची तयारी झालीय. मात्र शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार आणि एक अमूल्य ठेवा असणा-या किल्ल्यांकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होतंय याहून मोठी शोकांतिका कुठली?