'अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप...'; राऊतांची कठोर शब्दांत टीका

Ayodhya Ram Mandir Sanjay Raut Slams BJP: अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमामध्ये पावित्र्य कुठे आहे? असा थेट प्रश्नही ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 28, 2023, 03:36 PM IST
'अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप...'; राऊतांची कठोर शब्दांत टीका title=
पत्राकारांशी बोलताना केली टीका

Ayodhya Ram Mandir Sanjay Raut Slams BJP: अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामवरुन राज्याबरोबरच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे गटामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच आज उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाने थेट प्रभू रामाला किडनॅप केल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच अयोध्येतील हा कार्यक्रम भाजपाचा असल्याचं सांगत या कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचं म्हटलं आहे. 

संपूर्ण देशाचा कार्यक्रम नसून...

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी होत असलेला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राऊत यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर वर टीका केली आहे. अयोध्येतील हा बहुचर्चित कार्यक्रम संपूर्ण देशाचा नसून एका राजकीय पक्षाचा असल्याचं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. उत्तर प्रदेशाबरोबरच केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी एका पद्धतीने प्रभू श्रीरामाला किडनॅपच केलं आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

राजकारण करणाऱ्यांचे ना रामाशी नाते आहे ना...

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. "भाजपा पार्टी कोण आलीय रामलल्लाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देणारी. देव स्वत: भक्तांना बोलावतो. भक्त हे देवाच्या दरबारात स्वत: जात असतात. भाजपाने आपला उत्सव आणि प्रचार रॅली तिथे करणार आहे. त्यात पावित्र्य कुठे आहे? भाजपचा हा राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊ. भाजपाच्या या कार्यक्रमाला जाण्यात आम्हाला रस नाही. राजकारण करणाऱ्यांचे ना रामाशी नाते आहे ना रामाच्या विचाराशी नाते आहे. हा कार्यक्रम म्हणजे चुनावी जुमला आहे. त्यांना करायचे ते करू द्या," असं राऊत म्हणाले.

कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही

"हे निमंत्रण म्हणजे नेमकं काय आहे? हा एका पक्षाचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम आहे. उत्तर प्रदेश आणि केंद्रामध्येही भाजपाचं सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जाऊ रामलल्लांच्या दर्शनाला," अशा शब्दांमध्ये राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. 

कशातही भाजपाचं योगदान नाही

भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधताना राऊत यांनी या पक्षाचं कशातच योगदान नाही अशा टोला लगावला. "देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कवडीचेही योगदान नाही ते भारताच्या संसदेचे उद्घाटन करतात, अयोध्येच्या संघर्षात ज्यांचे योगदान नाही ते आज सगळ्यात पुढे आहेत. हेच राजकारण आहे. भाजपला वाटत असेल की ते पवित्र काम करत आहे, तर ते तसं काहीही नाहीये. या देशाचे संस्कार आणि संस्कृती त्याला मान्यता देत नाही",असे राऊत यांनी म्हटलं आहे.