"औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, आपल्या मुलांना समजवा"; हसन मुश्रीफांचा मुस्लिमांना सल्ला

Kolhapur Riots : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी काही लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर ते स्टेटस व्हायरल झालं आणि कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. या सर्व वादावर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 12, 2023, 01:07 PM IST
"औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, आपल्या मुलांना समजवा"; हसन मुश्रीफांचा मुस्लिमांना सल्ला title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) संदल उरुसच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या (Aurangzeb) फोटोचे फलक झळकवल्यांतर मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा देखील दाखल केला होता. ते प्रकरण शांत होत नाही तोच कोल्हापुरातही (kolhapur) औरंगजेबाच्या स्टेटसवरुन मोठा वाद उफाळून आला. या सर्व प्रकारानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. यादरम्यानही वाद झाल्याने पोलिसांना (kolhapur Police) लाठीचार्ज करावा लागला. या सर्व प्रकारानंतर राजकारण्यांकडूनही नागरिकांना सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

अशातच राज्याच्या राजकारणाती महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुस्लिम कुटुंबियांनी त्यांच्या मुलांना समजावून सांगण्यास सांगितले आहे. मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजवून सांगणे गरजेचे आहे, असं आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी काही आक्षेपार्ह स्टेटस विशिष्ट धर्माच्या लोकांनी फोनवर ठेवले होते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. या सर्व प्रकारानंतर कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले होती. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला होता. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

"कोल्हापूरमधील दंगल हे कोल्हापूर पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युर आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरातील वातावरण बिघडत आहे असेही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. शिवरायांना मुस्लिमांबद्दल कधीच आकस नाही, त्याच्यासोबत 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख हे मुस्लिम होते. त्यामुळे त्यांच्या सैन्यात किती मावळे मुस्लिम असतील याचा अंदाज आपणच बांधला पाहिजे. त्यामुळे औरंगजेब हा आपला शत्रूच आहे. त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही," असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. कागल मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

औरंगजेबाचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही  - अजित पवार

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन कसं कोणी करेल आणि ते का करावं? उगीचच त्या घटनेला वेगळं स्वरूप देऊ नका. अफझल खान असेल किंवा औरंगजेब असेल या लोकांचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. कोणीही त्यांचं समर्थन करणार नाही," असे अजित पवार यांनी म्हटलं होतं.