श्रीकांत राऊत, झी मीडिया
यवतमाळः पृथ्वीवर प्राचीन काळी डायनासोरचे अस्तित्व होतो. पण नैसर्गिंक घटनानंतर डायनासोर ही प्रजाती नामशेष झाली. आजही जगातील काही भागात डायनासोरच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात. भारतातही डायनासोरचे अस्तित्व होते असा दावा केला जातो आहे. काही दिवसांपूर्वी नर्मदा नदीच्या खोऱ्यात डायनासोरच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले होते. तर, अलीकडेच आपल्या महाराष्ट्रातही डायनासोरचे जीवाश्म सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
यवतमाळच्या वणीजवळ विशालकाय डायनोसोरची जीवाश्मे सापडल्याचा दावा भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. ६ कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसोर प्राण्यांचे हे जीवाश्म वीरकुंड गावानजीक सापडले आहेत. दोन वर्षांपूर्वी पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसोरचे जीवाश्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.
या परिसरात निओप्रोटेरोझोईक या 150 कोटी वर्षे दरम्यानच्या काळातील पैनगंगा गृपचा चुनखडक असून त्या काळात इथे समुद्र होता. जुरासिक काळात इथे विशालकाय अश्या डायनोसोर प्राण्यांचा विकास झाला. परंतु 6 कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसोर मारले गेले. इथे बेसाल्ट ह्या अग्निजन्य खडकाच्या रुपाने ते पुरावे आजही पाहायला मिळतात.
अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत. ह्या परिसरात अजून जमिनीत किंवा जंगली भागात डायनोसोरची जिवाष्शे आढळू शकतात. त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्वे आणि संशोधन होणे गरजेचे आहे. असे मत संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.
वीरकुंड गावाजवळ डायनोसोरचा अश्मीभूत सांगाडा असावा. पण लोकांनी जंगलात शेती करताना चुनखडकाचा वापर घरे बांधण्यासाठी केला होता. डायनासोरची हाडे आणि जीवाश्म दुरुन सारखेच दिसत असल्यामुळं काही गावकऱ्यांनी त्याचा वापर घरे बांधण्यासाठीदेखील केला होता. देशात असे प्रकार याआधीही घडल्याने जीवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत, असंही सुरेश चोपणे यांनी म्हटलं आहे.
मध्य भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात एकूण 256 जीवाश्मयुक्त अंडी असलेल्या 92 घरट्यांचा शोध लावला होता. ही घरटी अगदी जवळ-जवळ बनवलेली होती. डायनासोरची अंडी ही 15 सेमी आणि 17 सेमी व्यासाची असून यात टायटॅनोसॉरसच्या अनेक प्रजाती असू शकतात, असा दावा तेव्हा संशोधकांनी केला होता.