औरंगाबाद : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन बुडणाऱ्या एका महिलेचा आणि तिच्या पाच वर्षीय मुलीचा जीव वाचविणाऱ्या मुलाची यावर्षीच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आकाश खिल्लारे असे या धाडसी मुलाचे नाव असून तो औरंगाबाद तालुक्यातील हातमाळी या छोट्याशा गावचा रहिवासी आहे.
हातमाळी गावातील नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर एक महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत कपडे धुण्यात व्यस्त होती. यावेळी चिमुकली मुलगी तोल जाऊन नदीत पडली. मात्र महिलेलासुद्धा पोहता येत नसल्याने दोघीही बुडू लागल्या. याच दरम्यान, आकाश त्याच्या बहिणीसह शाळेत जात होता. त्याला मदतीची याचना करणाऱ्या माय-लेकीचा आवाज आला. यानंतर मागचा पुढचा विचार न करता आकाशने नदीत उडी घेतली आणि दोघींना सुखरूप बाहेर काढले. (नदीत बुडणाऱ्या या मायलेकांची सुटका)
खर तर लहानपणी आकाश नदीत पोहायला गेल्यावर त्याचे आजोबा त्याला मारायचे, बुडून जीव जाईल याची त्यांना सतत भिती, मात्र तिच लपून शिकलेली कला आज लोकांचा जिव वाचवायला कामी येत असल्यांनं अभिमान वाटत असल्याचं ते सांगताय, तर आकाशच्या शाळेचे शिक्षक सुद्धा अभिमान असल्याचं सांगतायत.
या शौर्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून त्याची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, पुस्तक खरेदीसाठी रक्कम, संपूर्ण शिक्षण व भारतात कुठेही प्रवास मोफत असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी देशभरातून २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.