अमरावती : वरुड मोर्शी मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची काही हल्लेखोरांनी गाडी जाळली आहे. आज सकाळी ही घटना समोर आली. यात उमेदवार देवेंद्र भुयार थोडक्यात बचावले असून शासकीय रुग्णालय अमरावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देवेंद्र भुयार यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर कार्यकर्तेनी गर्दी केली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मतदान करा, असे आवाहन केले.
अमरावती जिल्ह्यातला मोर्शी आज सकाळी ६.४० वाजता एका उमेदवाराची गाडी जाळल्याची घटना घडली. गाडीवर तीन वेळा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत होते. तसा आरोप उमेदवारचा होता. पण प्राथमिक माहितीनुसार फायरिंग झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र भुयार हे जखमी झालेले नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोणत्याही अफवाना बळी पडू नका सगळ्यांनी मतदान करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी केले आहे.
हा नियोजित हल्ला होता. आम्हाला जीवे मारण्याचा कट होता. आमच्यावर तीन राउंड गोरीबार करून आमची गाडी पेटवून देण्यात आली, असा आरोप आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यानी केला आहे.