रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : विधानसभा निवडणुकीच्या धांदलीत सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रचारसभा राज्यभर जोरात सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एकमेकांवर टीका-टिप्पणीही धुवाँधारपणे सुरू असलेली दिसतेय. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 'विश्वासघातकी' म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. 'शरद पवार यांची संपूर्ण कारकीर्दच विश्वासघातकी आहे. त्यांनीच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर यांनीच खुपसला होता' असं म्हणत 'अशा नेत्यांच्या मागे जाणाऱ्या उमेदवारांना मात्र तुम्ही निवडून देऊ नका' अशी सादही ठाकरे यांनी मतदारांना घातली.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. गौरव नायकवडी हे वैभव नायकवडी यांचे पुतणे आहेत.
'कालचं पोरगं आम्ही उभं केलंय. पण हाच पोरगा तुम्हाला धोबी पछाड मारायला तयार झाला आहे' असं म्हणत गौरव नायकवडी यांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंनी कौतुकाची थापही दिली. अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांचं नाव न घेता 'आमची मतं खाण्यासाठी एका बांडगुळाला तुम्ही मॅनेज करून उभं केलंत. पण त्याने काहीही फरक नाही पडणार' असा टोमणा त्यांनी यावेळी जयंत पाटील यांना हाणला.
'प्रचार करत असताना काही भुरटी मंडळी, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या वारशाबद्दल चुकीचं बोलत आहेत. मर्यादा पाळा, निवडणूक राहील बाजूला, आमच्या नादाला लागाल तर रक्ताचे पाट वाहतील' असं वादग्रस्त वक्तव्य क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी केलंय. नाव न घेता त्यांनीही यावेळी जयंत पाटील यांना टोले लगावले.