नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव आणि दिंडोरी मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. नांदगावात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांना भाजपच्या तीन-तीन उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी करत आव्हान दिले होते. त्यातील भाजपच्या संजय पवार आणि मनिषा पवार यांनी माघारी घेतली आहे. मात्र, रत्नाकर पवार हे अपक्ष म्हणून रिंगणामध्ये लढणार आहेत. त्यामुळे येथे रंगत वाढली आहे.
त्यामुळे नांदगाव मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ सेनेचे सुहास कांदे आणि रत्नाकर पवार, अशी तिहेरी लढत होणार आहे. तर दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांना सेनेच्या तीन-तीन उमेदवारांनी आव्हान दिले होते. यात नुकतेच राष्ट्रवादीतून आलेले धनराज महाले आणि दुसरे रामदास चारोस्कर होते या दोघांचेही शिवसेना एबी फॉर्म मिळाल्याने अर्ज बाद झाले आहेत तर अपक्ष अर्जही या दोघांनी मागे घेतले आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये तासातासाला मोठ्या राजकिय घडामोडी होत आहे. मनसेकडून आघाडीला छुपा पाठिंबा असल्याचे देखील उघड होत आहे. नाशिकमध्येही आता कोथरूड पॅटर्न पाहायला मिळत आहे. नाशिक पश्चिममधून शिवसेनेच्या तीन बंडखोरांपैकी मामा ठाकरे यांनी माघार घेतली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मनधरनीला यश आले आहे. उर्वरित दोघे सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांचीही मनधरणी केली जाईल, असा विश्वास भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला.
मात्र, बडगुजर आणि शिंदे हे दोघेही नॉटरीचेबल असल्यानं बंड कायम आहे. दुसरीकडे नाशिक पूर्वमधील मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे. तर भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मुर्तडक यांनी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे. त्यामुळे नाशिकमध्येही आघाडी आणि मनसेची छुपी युती असल्याचं उघड झाले आहे.