भर सभेत प्रकल्पबाधितांची घोषणाबाजी, पंकजा मुंडेचा राष्ट्रवादीवर आरोप

भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती

Updated: Oct 13, 2019, 05:27 PM IST
भर सभेत प्रकल्पबाधितांची घोषणाबाजी, पंकजा मुंडेचा राष्ट्रवादीवर आरोप title=

कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी चिंचवड : पंकजा मुंडे यांच्या पिंपरी चिंचवड येथील सभेत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानं सभेला गोलबोट लागलंय. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्यांना सभेबाहेर काढले. या प्रकरणी खबरदारी म्हणून पोलिसांनी पाच जणांना ताब्यातही घेतलं. 

भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं जाणावपूर्वक हे लोक पाठवले असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केलाय. दरम्यान येत्या २१ तारखेला राष्ट्रवादीचं घड्याळ कायमचे बंद करा आणि महाराष्ट्र राष्ट्रवादीमुक्त करा, असे आवाहन त्यांनी केलंय.

आपण मानसिकदृष्ट्या हरलेलो आहोत, हेच या कृत्यातून राष्ट्रवादीनं सिद्ध केलंय, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित रिंग रोडच्या प्रकल्पात काही नागरिकांची घरं नष्ट होणार आहेत. यापैंकीच काही प्रकल्पबाधित नागरिकांनी या सभेत गोंधळ घातला. पंकजा मुंडे यांचं भाषण सुरु असताना 'आमची घरं का पाडत आहात?' असा सवाल करत त्यांनी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. यामध्ये काही महिला आणि पुरुषांचा समावेश होता.