मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून अजित पवार यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आलाय. अजित पवार नेमके कुठे गेले ? याबबत अद्यापही माहीती समोर येत नाही. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सगळं सुरळीत होईल. निवडणूक अजित पवारांच्या नेतृत्वाखाली लढणार असे वक्तव्य तटकरेंनी केले आहे. तटकरेंनी 'झी २४ तास' ला ही माहीती दिली. त्यामुळे अजित पवार स्वत:हून समोर येऊन जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यावेळी, अजित पवारांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलं नसल्याचं बागडे यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला आता महिनाही उरलेला नसताना या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
ईडीनं माझ्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानं अजित पवार अस्वस्थ आणि उद्विग्न झालेत. त्यातूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेत व्यक्त केली. लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंबात कोणताही वाद नाही. आमचं कुटुंब एक आहे आणि एक राहिल. कुटुंबप्रमुख या नात्यानं माझा शब्द अंतिम असतो, असंही पवारांनी यावेळी ठासून सांगितलं. अजित पवारांशी बोलून त्यांची भूमिका समजून घेईन आणि त्यांना जबाबदाऱ्यांचं स्मरण करून देईन, असंही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.