BJPs Maha Mega Plan: विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरु आहे. कोणी जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रचार दौरे करत तर कोणी योजना जाहीर करतंय. राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भाजपकडून कोकणी मतदाराना खूष करण्यासाठी महा मेगा प्लॅन आखण्यात आलाय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपचा महा मेगा प्लॅन आणला आहे. गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून विशेष बस आणि रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगरातून तब्बल 700 बसेस आणि 6 ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच बस आणि ट्रेनच्या बुकिंगला भाजप कार्यालयात सुरुवात होणार आहे. मुंबईत कोकणी मतदारांचा आकडा मोठा आहे.याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून सर्वाधिक बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात बॅनर लागले आहेत. या बॅनरवर आशिष शेलार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. तसेच मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे यांच्यासोबत उज्ज्वल निकम यांचा फोटोदेखील दिसतोय.बॅनरवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून रायगड आणि पुढे कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सेवा असणार आहे. 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीत चाकरमान्यांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करतावेळी निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्डची खरी आणि झेरोक्स प्रत सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खार पश्चिम येथून या बस सुटणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा फोटो असलेल्या बॅनरवर विरार ते रत्नागिरी/सिंधुदुर्ग एसटी बस सेवा असा बॅनर लावण्यात आलाय. याची बुकींग 15 ऑगस्टपासून सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा 400 पारचा नारा मतदारांनी फार गांभीर्याने घेतलेला दिसला नाही. महाराष्ट्रातदेखील भाजप तसेच महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता या मेगा प्लॅनचा किती फायदा होतो, हे आगामी निवडणूक निकालानंतरच कळू शकते.