उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी नाणार मुद्यावर भाजपाला फटकारलं

 उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारच्या मुद्यावर भाजपला फटकारलं आहे. 

Updated: Oct 11, 2019, 04:41 PM IST
उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी नाणार मुद्यावर भाजपाला फटकारलं  title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : नाणारच्या मुद्यावरून सेना भाजपा पुन्हा आमने सामने आले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारच्या मुद्यावर भाजपला फटकारलं आहे. शिवसेना नाणारला एकदा घालवल्यानंतर परत प्रकल्प आणण्यासाठी कबुली देणार नाही. आम्ही एकदा प्रकल्प घालवला म्हणजे घालवला असे वक्तव्य सुभाष देसाई यांनी केले आहे. सर्वच पक्षांच्या नेतृत्वाच्या सहमतीने नाणार प्रकल्प आम्ही आणू, अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नाणारचा मुद्दा गाजणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नाणारच्याबाबतीत लोकांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समजून घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पार्श्वभुमीवर देसाई यांनी हे वक्तव्य केले आहे. 

राजपत्राला काही किंमत आहे की नाही ? असा प्रश्न विचारत हे जे लोक बोलतायत ते तोंडाची वाफ घालवतायत असा टोलाही त्यांनी लगावला. नको त्या मुद्यात तोंड खुपसू नये. नाणार गेलेला आहे, प्रदुषण न करणारे उद्योग कोकणात आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सुप्रीम कोर्टात जाण्याचा अवधी न ठेवता रातोरात झाडं कापण ही मोठा घोटाळ्याची गोष्ट आहे. या घोटाळ्याचा जाब प्रशासनाला द्यावा लागेल असेही ते म्हणाले. न्यायालयाचा विषय जिथं येतो तिथं सर्वांना न्यायलयाचा मान ठेवावा लागतो. असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आरोप करणाऱ्या विरोधकांना फटकारले आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युती झाल्यानंतर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेले आहेत. रत्नागिरीत एकही मतदारसंघ न मिळाल्याने भाजपकडून बंडखोरी झाली होती. मात्र, भाजपच्या बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर सिंधुदुर्गात युती तुटल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली. भाजपकडून नितेश राणे यांना एबी अर्ज दिल्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी झाली. शिवसेनेनेही बंडखोर उमेदवाराला एबी अर्ज दिला. त्यामुळे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे भाजपही आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.