नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : कबुतरांच्या अंड्याचं ऑम्लेट करुन खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. अर्णब मुखोपाध्याय असं मृत तरुणाचं नाव आहे. पुण्यातल्या लोहगाव मध्ये ही घटना घडलीय. लोहगावमधील गीनी बेनेला सोसायटी... सोसायटीच्या आठव्या मजल्यावर अर्णब मुखोपाध्याय हा छत्तीस वर्षांचा युवक राहायचा... मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास स्वयंपाकघराच्या बाल्कनीतून पडून अर्णबचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या. 'अर्णबने कबुतरांच्या अंड्याचं ऑम्लेट खाल्लं आणि आत्महत्या केली, तो दारुच्या नशेत होता, मानसिकदृष्ट्या आजारी होता. अंडी खाल्यानंतर तो चाकू घेऊन बायकोच्या मागे लागला, शर्ट काढून फॅनवर फेकून दिला, कबुतराचं भूत माझ्या अंगात आलं असं बरळायला लागला...' अशा चर्चा सुरु झाल्या. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
अर्णब दारुच्या नशेत होता. त्यानं कबुतरांच्या अंड्याचं ऑम्लेट करुन खाल्लं आणि त्यानं चाकू घेतला... हे वगळता बाकी सर्व खोटं असल्याचं पोलीस सांगत आहेत. मंगळवारी अर्णब रात्री घरी आला तोच दारूच्या नशेत... अर्णब वगळता घरात कोणी मांसाहार करत नव्हतं. मंगळवारीही त्याला अंडी खायची होती. पण रात्र झाल्यामुळे पत्नीने अंडी आणण्यास विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या अर्णबने कबुतरांच्या घरट्यातून अंडी काढली आणि त्याचं आम्लेट करून खाल्लं. मात्र यामुळे कबुतरांनी गोंधळ सुरू केला. त्यांना हाकलण्यासाठी अर्णब त्यांच्यामागे चाकू घेऊन लागला. त्याच्या बायकोने त्याला थांबवलंही, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यातच त्याचा तोल जाऊन तो आठव्या मजल्यावरून खाली कोसळला.
अर्णब मुखोपाध्याय मुळचा कोलकात्याचा होता. व्होडाफोन कंपनीत बॅक ऑफीसला काम करायचा. कुटुंबिय त्याचा मृतदेह गावी घेऊन गेलेत. पोलीस तपासात या घटनेची आणखी माहीती पुढं येईल... मात्र, कबुतरांची अंडी अर्णबच्या जीवावर बेतलीयत असंच आता तरी दिसतंय.