'सैराट'ची पुनरावृत्ती : मृताच्या पत्नीचा धक्कादायक जबाब

'तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आरोपी बालाजी लांडगे याची भीड चेपली'

Updated: Dec 20, 2018, 03:52 PM IST
'सैराट'ची पुनरावृत्ती : मृताच्या पत्नीचा धक्कादायक जबाब title=

बीड : बीडमधल्या हत्याकांडाप्रकरणी धक्कादायक बाब समोर आलीय. आपल्या माहेरचे लोक वारंवार त्रास देत होते. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेलो असता आपल्याला हाकलून देण्यात आलं, अशी माहिती सुमीतची पत्नी भाग्यश्री वाघमारे हिनं केलीय. कुणाच्यातरी राजकीय दबावामुळे आपली तक्रारच घेतली गेली नाही... त्यामुळेच सुमीतची हत्या झालीय, असंही भाग्यश्रीनं म्हटलंय. या घटनेमुळे भाग्यश्री चांगलीच हादरलीय. 

दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे सगळा महाराष्ट्र हादरलाय. मात्र तक्रारींकडे पोलिसांनीच दुर्लक्ष केल्यामुळे आरोपी बालाजी लांडगे याची भीड चेपली असेल, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झालाय... तसंच तक्रार न घेण्यामागे कुणाचा राजकीय हस्तक्षेप होता, हेदेखील समोर आलं पाहिजे.  

बीडमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती... 

बीडमधल्या गांधीनगर भागात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सुमित वाघमारे यानं दोन महिन्यांपूर्वी भाग्यश्री साबळे हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला भाग्यश्रीचा भाऊ संकेत साबळे याचा विरोध होता. आपल्या बहिणीचे लग्न आपल्या मनाविरुद्ध झाले म्हणून संकेतनं अनेकदा गोंधळही घातला होता. बुधवारी १९ डिसेंबर रोजी सुमीत आपल्या पत्नीसह महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा देऊन सुमीत बाहेर पडल्यानंतर संकेत याने आपल्या मित्रांसह सुमीतवर चाकूने हल्ला केला. चार - पाच जीवघेणे वार करून हल्लेखोर पसार झाले.  

पोलीस अधिक्षक ई श्रीधर यांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलंय. यासाठी पथकं रवाना करण्यात आलीत तसंच जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. तसंच आरोपींच्या मोबाईल लोकेशन्स धुंडाळून काढली जात आहेत.