तुमच्या “एफडी” सुरक्षित आहेत का ?.

सायबर गुन्हेगार एफडीवर काढतायेत कर्ज...

Updated: Feb 28, 2023, 06:02 PM IST
तुमच्या “एफडी” सुरक्षित आहेत का ?. title=

सोनू भिडे, नाशिक :- 

बँक खातेधारकाची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता सायबर गुन्हेगारांनी एक नवीन लुटीची शक्‍य लढवली आहे. खातेधारकाला लिंक पाठवून त्यांची मुदत ठेव गहाण ठेऊन त्याच्यावर पाच लाख पंचवीस हजाराचे कर्ज काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भरत कासार यांची झाली फसवणूक

भरत वामन कासार हे नाशिक शहरातील सातपूर येथे वास्तव्यास आहे. त्यांचे नाशिकच्या बँक ऑफ इंडियात बचत खाते आहे. मुलीच्या लग्नासाठी भरत यांनी स्वतःचे घर विकून यातून मिळालेल्या रकमेतून त्यांनी सात लाखांची एफ. डी. केली होती. मात्र  भरत यांना त्यांच्या मोबाईलवर २२ फेब्रुवारीला सायंकाळी एक मेसेज आलाय. या मेसेज मध्ये एक लिंक देण्यात आली होती. पॅनकार्ड व्हेरिफिकेशन साठी लिंक ओपन करून त्यातील सर्व माहिती भरण्याची विनंती यात करण्यात आली होती. 

अशी झाली फसवणूक 

मेसेज मध्ये दिलेली लिंक ओपन केल्याने मोबाईल मध्ये थेट एक अॅप डाउनलोड झाले. या अॅपमुळे आपल्या मोबाईलमध्ये आपण करत असलेली संपूर्ण क्रिया समोरील व्यक्तीस दिसून येते. यामुळे भरत कासार यांच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हा सायबर गुन्हेगारांच्या हातात गेला होता. कासार यांच्या मोबाईल मधील संपूर्ण माहिती गुन्हेगारांना मिळाली होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने कासार २३ फेब्रुवारीला बँकेत तपास करण्यासाठी गेले असता बँकेच्या अॅपच्या माध्यमातून मुदत ठेवीवर गुन्हेगारांनी पाच लाख २५ हजारांचे कर्ज काढल्याचे लक्षात आले. 

पोलिसांच्या सतर्कतेमुळे पैसे मिळाले परत 

फसवणूक झाल्याची माहिती बँकेने दिल्यानंतर कासार यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबधित बँकेला विचारणा केली असता कासार यांचे पैसे तीन बँकेत वर्ग झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संबधित बँकेला माहिती देऊन कासार यांचे पैसे काही तासात परत मिळवून दिले आहेत.