नागपुरात 17 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडिज, नकळत कोरोना होऊन गेल्याचं उघड

कोरोना लसीच्या चाचण्यांसाठी 2 ते 18 वयोगटातील मुलांची निवड करताना ही बाब निदर्शनास आलीय

Updated: Jul 4, 2021, 04:15 PM IST
नागपुरात 17 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडिज, नकळत कोरोना होऊन गेल्याचं उघड title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांसाठी क्लिनिक चाचणीचा (Clinical Trial) पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लहान मुलांवरील लस देण्यापूर्वी अर्थात ह्यूमन ट्रायल नागपुरात सुरू झाल्यानंतर लसीचा पहिला डोस देण्यापूर्वी झालेल्या स्क्रिनिंगमध्ये जी माहिती समोर आली, त्यानुसार  2 ते 18 वर्ष वयोगटात 17 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडिज (Antibodies) विकसित झाल्याचं स्पष्ट होत आहे. स्क्रिनिंगमध्ये 104 पैकी 18 जणांमध्ये अँटिबॉडिज तयार झाल्या होत्या. अर्थात या मुलांना नकळत कोरोना होवून गेला होता. 

कोरोनाच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असेल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं लहान मुलांसाठी लस कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याकरताच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांसाठीच्या ट्रायल्स नागपुरात सुरु आहेत. नागपूरच्या क्लिनिकल चाचणीपूर्वी 2 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये अँटिबॉडिज तयार झाल्याची बाब पुढे आली आहे. 

नागपुरातील मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये  2 ते 6 वर्ष, 7 ते 11 वर्ष आणि 12 ते 18 वर्ष वयोगटात या क्लिनिकल चाचण्यांचा पहिला डोज डॉक्टर वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. त्यापूर्वी 12 ते 18 वर्ष वयोगटातील 50 मुलांचं स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. त्यापैकी 10 मुलामध्ये अँटीबॉडिज आढळल्या.  तर 6 ते 12 वर्ष वयोगटातील 34 मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आलं. त्यांपैकी 5 जणांमध्ये अँटीबॉडिज होत्या. तर 2 ते 6 वर्ष  वयोगटातील 20 मुलांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. या गटात 3 मुलांमध्ये अँटीबॉडिज आढळल्या.

कोरोना लसीच्या चाचण्यांसाठी 2 ते 18 वयोगटातील मुलांची निवड करण्यात आली. यावेळी त्यातील काही मुलांच्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून शहरातील अन्य मुलांचीही स्थिती वेगळी नाही, असं वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांचं मत आहे. दुसऱ्या लाटेत या मुलांना कळत न कळत कोरोनाचा संसर्ग होऊन गेला. त्यामुळे शहरातील अन्य मुलांमध्येही अँटिबॉडीज तयार झाल्या असण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, बालरोगतज्ज्ञ डॅा. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या मेडीट्रीना हॅास्पीटलमध्ये लहान मुलांच्या कोरोना लसीची चाचणी सुरु आहे. ही चाचणी प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेशी दोन हात करणे सोपे होणार आहे. लहान मुलांचे लसीकरण झाले तर तिसऱ्या लाटेत त्यांना असलेला धोका टाळता येऊ शकेल, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.