महापुराच्या संकटानंतर नंदूरबारला आणखी एक धोका

 शुक्रवारी झालेल्या ढगफुटीमुळे या गळतीने थेट धबधब्याचे रूप धारण केलंय. 

Updated: Aug 18, 2018, 05:38 PM IST
महापुराच्या संकटानंतर नंदूरबारला आणखी एक धोका  title=

किरण ताजणे, झी मीडिया, नंदूरबार : नवापूर शहरात महापुराच्या संकटानंतर आता नवापूर येथे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. नवापूर तालुक्यातील खोकसा धरणाच्या दगडी भिंतीला मोठी गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गेल्या दोन वर्षांपासून या धरणाच्या भिंतीला गळती लागली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या ढगफुटीमुळे या गळतीने थेट धबधब्याचे रूप धारण केलंय.

त्यामुळे जर ह्या ठिकाणी जर ही भिंत कोसळली तर मोठी हानी होण्याची दाट शक्यता आहे. गाव देखील नाहीसे होईल अशी शक्यता येथील स्थानिक शेतकरी करताय.

प्राथमिक पंचनामे पूर्ण 

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे प्राथमिक पंचनामे पुर्ण झाले असून यात पावसानं नवापुर तालुक्यात किती संहार केलाय हे स्पष्ट होतंय. नवापूरतल्या अतिवृष्टीनं पाच जणांचा बळी घेतला. दोन जण बेपत्ता आहेत. तर हजारो हेक्टर क्षेत्रातलं पीक भुईसपाट झालंय. रंगावली नदीनं सर्वाधीक कहर केलाय. २०० घर वाहून गेली. ५०० घरात पाणी शिरल्यानं नुकसान झालं. तर ५० पाळीव जनावरं वाहून गेली. दुर्गंधी पसरू नये यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सावध करण्यात आलंय.

नवापूर तालुक्यात १५० विज खांब कोसळल्यानं अनेक भागात विज पुरवठा खंडीत झालाय. तर गावांना जोडणारे रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटलाय. नागपूर- सुरत महामार्गाची वाहतूक धिम्यागतीनं सुरू करण्यात आलीय.