मुरगुड नगरपालिकेत राडा, संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवर फेकली चप्पल

कोरोनाच्या मुद्द्यावर आज कागल तालुक्यातील  मुरगुड नगरपालिकेत राडा पाहायला मिळाला. 

Updated: Jun 4, 2020, 03:22 PM IST
 मुरगुड नगरपालिकेत राडा, संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवर फेकली चप्पल title=

कोल्हापूर : कोरोनाच्या मुद्द्यावर आज कागल तालुक्यातील  मुरगुड नगरपालिकेत राडा पाहायला मिळाला. संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवरच चप्पल फेकली. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. हा सगळा प्रकार मुरगुड नगर  पालिका कार्यालयात घडला. कोरोनाबाधित २० वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री क्वारंटाईन कक्षात असल्याचे दाखवले असल्याचे समजताच नागरिक संतप्त झालेत. त्यानंतर नागरिकांनी नगरपालिकेत धडक मारली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी मुरगुड नगर पालिका मुख्याधिकाऱ्यावर चप्पल फेकली.

प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप संतापलेल्या नागरिकांनी यावेळी केला. या घटनेवरुन मुरगुडमधील वातावरण तापले असून मुरगुड  पालिका कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे. यावेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. काही वेळात या ठिकाणी प्रचंड गोंधळ सुरु झाला. दरम्यान संतप्त नागरिकांनी पालिकेतील काही बॅनर फाडून भिरकावले.  संपूर्ण पालिका, स्वच्छता कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली. 

 संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करताना नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यावर चप्पल फेकली, मात्र, सुदैवाने त्यांच्यापर्यंत ती पोहोचली नाही. या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका नगरसेवक याचे लक्ष झाला. संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली. या रुग्णाला पाठीशी घालून त्याला घरी दडवणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, याचा जाब लोकांनी विचारला.