Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवाला शनिवारपासून सुरूवात झाली आहे. शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासूनच देवीच्या दर्शनाला सुरूवात झाली आहे. मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बरीच लगबग पाहायला मिळाली होती. शनिवारी सकाळी इथं भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी 9 रांगा सुरु करण्यात आल्या आहेत. जत्रेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी 11 वाजता भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. भराडी देवीच्या यात्रेसोबत या भागात यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यावेळी नाटक, देवीचा जागरण गोंधळही इथं मांडला जातो.
कोकणच्या मालवण तालुक्यात असणाऱ्या मसुरे नावाच्या गावात देवी भराडी विराजमान आहे. आंगणेवाडी नावाच्या वाडीत देवीचं वास्तव्य आहे. देवीबद्दलची माहिती देताना अशी कथा सांगितली जाते की, देवी भराडावर म्हणजेच माळरानावर प्रकट झाली म्हणून तिला भराडी देवी' असं नाव देण्यात आलं. तुम्ही आजही पाहिलं, तर या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरानाचाच असल्याचं लक्षात येतं.
ही देवी मसुरे गावातील आंगडे कुटुंबीयांची. पण, तिची महती इतकी की देशोदेशीहून भाविक इथं दर्शनासाठी येतात. इथं वर्षाच्या बाराही महिने भक्तांची ये-जा सुरुच असल्यामुळं देवीचं मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येतं.
नवसाला पावणारी देवी अशी महती असणाऱ्या भराडी देवीसाठी अवघ्या दीड दिवसाच्या जत्रेसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक इथं येतात. रंजक गोष्ट अशी, की देवीला दाखवण्यात येणारा नैवेद्यही अतिशय खास असतो. जो माहेरवाशिणी काहीही न बोलता तयार करतात. जत्रेसाठी येणाऱ्यांना या नैवेद्याचा लाभ मिळतो. जो आंगणेवाडीच्याच महिलांनी तयार केलेला असतो.