Maharashtra News Today: उद्धव ठाकरे यांचा गडकरी रंगायतन येथील मेळावा संपताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
शिवेसेनेच्या सुरुवातीच्या काळात अनिताताई बिर्जे यांनी शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. 'धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर या निर्णयाला अनिता बिर्जे यांनी विरोध केला होता. त्यांनी ठाकरे गटात राहणेच पसंत केले होते. तेव्हा त्यांनी उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच अनिताताई बिर्जे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारीदेखील नाराज असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यात मेळावा सुरू असतानाच अनिता बिर्जे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बिरजेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.