क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 18, 2024, 09:48 AM IST
क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे 14 तरुण ट्रॅव्हलरमधून जात होते. अमरावतीवरून हे सर्वजण यवतमाळसाठी जात असताना नांदगावच्या खंडेश्वर शिंगणापूरजवळ हा भीषण अपघात झाला. जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ठाण्यात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

ठाण्याच्या माजिवाडा पुलावर ट्रकने दुचाकीला शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दिलेल्या धडकेत अक्षया पांडे (32,पाचपाखाडी) यांचा मृत्यू झाला. माजिवाडा येथील पुलावर हा भीषण अपघात झाला. पांडे या दुचाकीवरुन फेकल्या गेल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना शहर वाहतूक पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.