मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटले (Praful Patel) यांची अहमदाबादमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. यावरुन राज्याच्या राजकारणात आता आणखी एक भूकंप होतो की काय अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा पवारांसोबत भेटीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा अमित शाहांनी, 'सब चीजे सार्वजनिक नही होती.' असं म्हणत या चर्चेमागचं गूढ कायम ठेवलं आहे.
राज्यात एकीकडे सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण, परमबीर सिंह यांचं पत्र हे प्रकरण गाजत असताना दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे.
राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे सरकार कुठेतरी या सगळ्या प्रकरणावरुन अडचणीत आल्याचं चित्र आहे.
अहमदाबादमध्ये एका फार्महाऊसवर 26 मार्चला रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याचा दावा केला जात आहे. एका गुजराती वृत्तपत्राने हा दावा केला आहे. राष्ट्रवादीने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही अफवा असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊतांची सामनातून टीका
परमबीर सिंग यांनी आरोप केले तेव्हा गृह खाच्याचे आणि सरकारचे वाभाडे निघाले. पण महाराष्ट्र सरकारचा बचाव करण्यासाठी एकही महत्त्वाचा मंत्री पुढे आला नाही. चोवीस तास गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. लोकांना परमबीर यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले याचे कारण सरकारकडे डॅमेज कंट्रोलची कोणतीही यंत्रणा नाही.' अशा शब्दात संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.