सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका, शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान

परतीच्या पावसाच्या नुकसानीतून कापूसही सुटला नाही.

Updated: Oct 9, 2020, 03:18 PM IST
सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका, शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान  title=
फोटो सौजन्य- शुभम भगत

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : आधीच संकटाच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने नवं संकट उभं केलंय. सोंगुण शेतात वाळण्यासाठी टाकलेल्या सोयाबीन पिकाला परतीच्या पावसाचा जबर फटका बसलाय. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर या भागात मुसळधार असा परतीचा पाऊस झाल्याने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालंय.

बोगस बियान्यामूळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर कमी जास्त पाणी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशा ही परिस्थितीत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं सोयाबिनचं पीक या परतीच्या पावसाने निस्तानाभूत केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या पाठीवर नुकसानीची कुऱ्हाड निसर्गाने चालवल्याची खंत शेतकरी विष्णू शेंडे व्यक्त करतात.  

मागील १० दिवसापासून जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या कामाला वेग आला आहे. असे असले तर आधी खोडकिडी आणि आता चार दिवसापासून सुरू असलेल्या परतिच्या पावसाने नुससान होत आहे. या वर्षी एकट्या पश्चिम विदर्भातील १ लाख ३१ हजार हेक्टर वरील खरीप पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार ने मदत करावी अशी मागणी सरकार पुढे केल्याचे शेतकरी गंगाधर मात्रे सांगतात.

अमरावती जिल्ह्यात सोयाबीन बरोबरच कापसाचे उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे या परतीच्या पावसाच्या नुकसानीतून कापूसही सुटला नाही. वेचणीला आलेला कापूस ही परतीच्या पावसामुळे गळून जमिनीवर पडला आहे. तर झाडाला असलेले बोंडें ही आता अती पावसाने सडून जाऊ लागले आहे. त्यामुळे आता शासन शेतकऱ्यांना मदत करणार की पुन्हा सर्वेक्षनाचा फास आणणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.