बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...

Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 21, 2024, 07:05 AM IST
बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...  title=
Akola News School Teacher Held For Sexually Harassing 6 Girl Students

Crime News In Maharashtra: बदलापूर आणि पुणे येथे शाळेत चिमुकल्यांसोबत घडलेल्या अत्याचाराचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटना ताज्या असतानाच अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आरोपी शिक्षक आठवीत शिकणाऱ्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्याचप्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पादेखील मारायचा. या प्रकरणी काल संध्याकाळी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याच्याविरोधात पॉस्को सह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पीडित मुलींना शिक्षकांसोबतचे त्यांचे वर्तन त्यांच्या पालकांना सांगितले. त्यानंतर आरोपीचे विकृत कृत्ये उघडकीस आले आहेत. त्यानंतर पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संताप जनक घटनेचे माहिती मिळताच उरळ पोलिसांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तत्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. तसंच, सहा विद्यार्थिनींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. सध्या हा आरोप शिक्षक पोलिसांच्या अटकेत असून त्याला लवकरच  न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याप्रकरणी माजी महिला आयोग समितीच्या सदस्य आशाताई मिरगे यांनी थेट पोलिस आणि पालकमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर आरोपी शिक्षकासह या शाळेतील कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

पुण्यातही धक्कादायक प्रकार

पुण्यातून धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर शाळेतील एका विद्यार्थ्याने स्वच्छतागृहात येऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सगळा प्रकार स्वतंत्र दिनाच्या दिवशी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 15 ऑगस्ट रोजी पीडित तरुणी शाळेत गेली असता बॅग आणण्यासाठी वर्गात जात असताना आरोपीने हे कृत्य केलं. या संपूर्ण प्रकरणी अधिक तपास देखील सुरू आहे. 

बदलापूरमध्ये उसळला जनआक्रोश

बदलापूरातील एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आलाय .दरम्यान या घटनेनंतर बदलापूर शहर हादरलं असून संतापजनक बाब म्हणजे बदलापूर पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात   तब्बल १२ तास नंतर गुन्हा दाखल केला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं. शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.