Ajit Pawar Slams Sharad Pawar Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीमध्ये तब्बल 7 सभा घेतल्या. या सभांमधून अजित पवारांनी बारामतीकरांचं पाठबळ आपल्या पाठीशी असावं असं आवाहन मतदरांना केलं. बारामतीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी थेट त्यांचे चुलते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचा उल्लेख न करता त्यांना पुन्हा एकदा वयावरुन टोला लगावला. तसेच शरद पवारांची कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनाही अगदी नक्कल करत टोला लगावला आहे.
आपण कायमच येथील लोकांच्या कामांना प्राधान्य दिलं आहे, असं अजित पवार बारामतीमधील भाषणामध्ये म्हणाले. तसेच उमेदीच्या काळातच जनहिताची कामं होतात असं सूचक विधान करत अजित पवारांनी थेट कोणाचीही उल्लेख न करता टोला लगावला. "उमेदीच्या काळातच कामं होत असतात. उतार वयातील लोकांनी आशिर्वाद देण्याचं काम करायचं असतं. चुकलं तर कान धरायचा असतो. फारच काही कंटाळा आला तर भजन करायचं असतं," असं अजित पवार म्हणाले. यापूर्वीही अजित पवारांनी शरद पवारांविरोधात 2023 मध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंड करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाचा कारभार आता इतरांकडे सोपवणं गरजेचं होतं अशा अर्थाचं विधान करतानाच अजित पवारांनी शरद पवारांकडून वारंवार डावललं गेलं असा टिकेचा सूर लगावला होता. आता पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
आमदार निलेश लंके हे शरद पवार गटाबरोबर जणार हे गुरुवारी जवळपास निश्चित झालं असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याची परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी थेट सुप्रिया सुळेंचा उल्लेख टाळत टोला लगावला. मात्र यावेळेस अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची मिमिक्री केली. "अनेक जणांना फोन येत आहेत. अनेकांना भावनिक आवाहन केलं जात आहे. भावनिक होण्याऐवजी विकास कामांना पाठिंबा दिला पाहिजे," असंही अजित पवारांनी सांगितलं. पुढे बोलताना सुप्रिया सुळेंचा थेट उल्लेख टाळत अजित पवारांनी 15-15 वर्ष फोन न केलेले लोक आता फोन करुन विचारपूस करतील असं म्हटलं.
"काहीजण तुम्हाला फोन करतील. ज्यांचा 15 वर्षात फोन आला नाही कधी नीट बोलले नाहीत ते पण फोन करतील," असं अजित पवार म्हणाले. पुढे अजित पवारांनी अगदी नाजूक आवाजात, "अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट," असं सुप्रिया सुळेंची मिमिक्री केली. इतक्या दिवस तुम्ही काय केलं? असा सवाल निवडणूक काळात अनेकांना फोन करुन गाठीभेटी घेणाऱ्यांना अजित पवारांनी लगावला. "असे फोन येतात ही वस्तूस्थिती आहे. मी कोणाला फोन करत नाही. मी तुमचं काम करतो. कामाच्या निमित्तानं फोन करायचं असेल तर करु," असंही अजित पवार म्हणाले.