'देशाला मोदींशिवाय पर्याय नाही', अजित पवारांचं विधान; शरद पवार म्हणाले 'यापेक्षा वेगळा निकाल...'

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाचीच सत्ता येत असल्याचं चित्र दिसत आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2023, 01:34 PM IST
'देशाला मोदींशिवाय पर्याय नाही', अजित पवारांचं विधान; शरद पवार म्हणाले 'यापेक्षा वेगळा निकाल...' title=

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपा आघाडीवर असून, त्यांचीच सत्ता येईल असं चित्र दिसत आहे. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष सुरु केला आहे. 2024 लोकसभा निवडणुकीआधीची सेमी-फायनल म्हणून पाहिली जात असलेल्या या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निकाल पाहता देशाला मोदी आणि शाह यांच्याशिवाय पर्याय नाही असं विधान केलं आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी यापेक्षा वेगळ्या निकालाची अपेक्षा काय करणार असं म्हटलं आहे.

अजित पवार हे रायगडमधील एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं. ते म्हणाले की, "पत्रकार मला सारखं विचारत होते. काही महिन्यापूर्वी 4 राज्यात निवडणुका झाल्या. आज त्या निवडणुकीचा निकाल येत आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही महत्त्वाची राज्यं आहेत. तेलंगणात बीआरएसने राज्यातील योजनांचा देशभरात प्रचार केला.  मला असं का ते समजत नव्हतं. ते महाराष्ट्रात येऊन सभा घ्यायचे. ते देशाचे नेतृत्व कार्याला निघाले होते. महाराष्ट्रात सत्तापालट करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिथं त्यांचे सरकार येईल असं वाटतं नाही".

"बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार कसा वापरायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. एक्झिट पोल तर चुकीचे ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपाचं सरकार येत आहे. छत्तीसगडमध्ये वेगळा निकाल लागेल असं बोललं जात होतं. पण तिथेहीभाजपा येत आहे. त्यामुळे मी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यासह सर्वांचं अभिनंदन करतो," असंही ते म्हणाले. 

"आम्ही निर्णय घेतला तो अनेकांना आवडला नाही पण आताचे निकाल बघता देशाला नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशिवाय पर्याय नाही," असंही अजित पवार यांनी सांगितलं. तर शरद पवारांनी यापेक्षा वेगळ्या निकालाची अपेक्षा काय करणार अशी खंत व्यक्त केली.