Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 3, 2023, 10:08 AM IST
Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट title=

Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 

राज्यात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र कोकणात मात्र हवामान अतिशय कोरडं पाहायला मिळणार आहे. 

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD च्या अंदाजानुसार, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला येथे वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात धडकलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा राज्यात २४ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेली काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुके पसरल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवला गेला आहे तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.