'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावा

Ajit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 10, 2024, 02:38 PM IST
'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावा title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं मत

Ajit Pawar Group Exit Government Comment: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुतमाचा कौल मिळालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या 64 नेत्यांनी रविवारी, 9 जून 2024 रोजी दिल्लीतील राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मित्रपक्षांनाही स्थान देण्यात आलेलं असलं तरी यामध्ये महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाला स्थान देण्यात आलेलं नाही. अजित पवार गटाने राज्यात एकूण 4 जागा लढवल्या. मात्र केवळ रायगडमधील जागेवर त्यांना विजय मिळवता आल्याने कॅबिनेट मंत्रिपद नाकारण्यात आलं. स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्य मंत्रिपद स्वीकारण्यास अजित पवार गटाने नकार दिला. यावरुनच आता राज्यामध्ये अजित पवार गट अस्वस्थ आणि नाराज असल्याची चर्चा रंगत असतानाच काँग्रेसचे नेते तसेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. 

...तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते

मोदी सरकार 3.0 च्या शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी, "केंद्रात सरकार आली नसती तर ते (अजित पवार) बाहेर पडले असते," असं विधान अजित पवारांच्या गटाबद्दल बोलताना केलं. वडेट्टीवार यांनी पुढे बोलताना, "जसं फडणवीसांचं ईडीचं प्रकरण बंद झालं त्याप्रमाणे त्यांची सगळी प्रकरणं बंद झाली असतील. असं अनेकांचं आहे. भुजबळांचीही तीच स्थिती आहे. सत्तेत जाऊन आपली प्रकरणी फाईल करुन येत असतील तर हा एक नवीन कल्पना आहे. भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना नुकताच ईडीने मोठा दिलासा दिला. त्यांची जप्त केलेली 180 कोटींची संपत्ती परत केल्याचं समोर आलं आहे.

अजित पवार गटाला नेमकी काय ऑफर होती आणि त्याचं काय झालं?

दरम्यान, केंद्रातील मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासंदर्भात अजित पवार गटाला काय ऑफर देण्यात आलेली यासंदर्भात स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. "राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र कारभार पद देण्यात येणार होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं आहे. त्यामुळे त्यांनी राज्यमंत्रिपद नाकारले," असं फडणवीस म्हणाले. तर अजित पवार यांनीही या नाकारलेल्या मंत्रिपदासंदर्भात आपली भूमिका मांडली.

नक्की वाचा >> 'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला

"आम्ही अमित शाह, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. मात्र त्यानंतर आमची कबॅनेट मंत्रिपदाची मागणी मान्य झाली नाही. आमचे आणखी 2 खासदार लवकरच राज्यसभेवर निवडून येणार आहेत. त्यावेळी आमचे संख्याबळ वाढलेलं असेल," असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.