Ajit Pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल, मी मराठ्याची अवलाद", अजितदादांनी कोल्हापूरात ठोकले शड्डू!

Ajit pawar Kolhapur Speech : मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची अवलाद आहे. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती, असं अजित पवार म्हणाले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Sep 10, 2023, 11:07 PM IST
Ajit Pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल, मी मराठ्याची अवलाद", अजितदादांनी कोल्हापूरात ठोकले शड्डू! title=
Ajit pawar, kolhapur News, maharastra politics,

Ajit Pawar In Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा झंजावती दौरा सुरू आहे. शरद पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात सभा घेत असल्याने अजित पवार (Ajit Pawar) गट देखील प्रत्युत्तर देताना दिसतोय. शरद पवारांनी अलिकडेच बीड आणि कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) सभा घेतल्या. त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर आसुड ओढले. त्यावेळी शरद पवारांनी इतर बंडखोर नेत्यांचा समाचार घेतला. त्यावर आता अजित पवार यांनी कोल्हापूरात सभा घेत घणाघात केला आहे. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका केली.

काय म्हणाले अजित पवार?

उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं. एक दोन आमदार सुटले असतील पण सर्वांनी ठरवलं होतं की महायुतीमध्ये सामील व्हायचं. हे जर खरं नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईल. खरं असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. 

काही लोकं म्हणतात अजित पवार यांनी असा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणता दबाव होता का? त्यानंतर काहींनी आमच्यावर टीका केली. नक्कीच आमच्यावर दबाव होता, परंतु मला एकच सांगायचं आहे की आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याचा दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची अवलाद आहे. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती. हाती घेतलेली कामं पूर्ण करण्याचा दबाव आमच्यावर होता, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मुंबई आर्थिक राजधानी, पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या प्रमाणं कोल्हापूर हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचं केंद्र म्हणून ओळखलं जातं, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणवार मोर्चा वळवला. जो गरिब आहे, त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. काही ओबीसी देखील आमच्यावर अन्याय नको असे म्हणत आहेत. त्यामुळे उद्या सह्याद्रीवर सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आहे, असं अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा - शरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत

दरम्यान, राज्यात समाधानकारक पाऊस चांद्यापासून बांद्यापर्यंत पडावा, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच आम्ही सारथी आणि महाज्योतीच्या वतीने अनेक ठिकाणी वसतीगृह निर्माण करत आहोत, असं वक्तव्य देखील अजित पवार यांनी केलंय.