Ajay Devgan Junglee Rummy Adverstising: नांदेडमधील महिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या विलास शिंदे यांनी अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan)पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये शिंदे यांनी 'जंगली रम्मी' (Junglee Rummy) या ऑनलाइन गेमची जाहिरात करणाऱ्या अजय देवगणला तुम्ही स्वत: हा गेम खेळता का असा प्रश्न विचारला आहे. तसेच हा गेम खेळून तुम्ही नेमके किती पैसे आजपर्यंत कमवले आहेत याची माहिती द्यावी अशी मागणीही शिंदेंनी केली आहे.
अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्याच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेल्या या पत्रामध्ये विलास शिंदेंनी जंगली रम्मी गेमची जाहिरात (Junglee Rummy Ad) करण्याचा उद्देश काय आहे असं विचारलं आहे. "आपण ज्या जंगली रम्मू ऑनलाइन गेमची जाहिरात करता तो जंगली रम्मी ऑनलाइन गेम खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकले आहेत? या जाहिरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरुण व कर्जबाजारी तरुणांना आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे," असा या पत्राचा विषय आहे.
"अजय देवगण सप्रेम नमस्कार व राम राम. आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात लाखो नवतरुण आहेत. ही तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आजकाल सोशल मीडियाचा वापर अनेक तरुण करतात. तरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्याने सोशल मीडियावरुन केले पाहिजे. पण सोशलम मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाइन गेमची जाहिरात पाहून अनेक तरुणांना हा गेम खेळण्याची जणू सवयच लागली आहे. याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत," असं विलास शिंदेंनी या पत्रात म्हटलं आहे.
@ajaydevgn स. नमस्कार राम राम pic.twitter.com/n8NZTjsfrW
— vilas shinde (@vilas641) June 20, 2023
"अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की आपण जंगली रम्मी हा ऑनलाइन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकले आहेत? तसेच या जाहिरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितलं पाहिजे. हेच जाणून घेण्याची तरुणांना इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हे सर्व सांगावं. या गेमवर काही राज्यांनी बंदी घातली आहे तरी आपण मात्र बिनधास्त यांची जाहिरात करता," असंही शिंदेंनी या पत्रात म्हटलं आहे.
"महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे, हे पण आपण सांगितले पाहिजे. हाच गेम तुमच्या आजूबाजूचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण सांगितले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील तरुणांना चांगल्या गोष्टींचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करुन तरुणांना काय देत आहात हे सांगावं. फक्त जाहिरात करुन पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे, या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहिरात बंद करावी. तरुणांचा चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती," असंही पत्राच्या शेवटी विलास शिंदेंनी म्हटलं आहे.